स्पर्धा परीक्षा आणि प्लान B

नमस्कार ....!

या अगोदरच्या एका लेखामध्ये आपण स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी इयत्ता दहावीनंतर कुठले क्षेत्र निवडायला हवे याबद्दल पाहिले. लहानपणापासून IAS, IPS, PSI किंवा सरकारी बँकेमध्ये पोस्ट मिळवण्याचे स्वप्न लाखो मुलं पाहतात. त्यासाठी जीवापाड मेहनत करतात. तहान-भूक विसरून अगदी वेड्यासारखी या परीक्षांची तयारी करतात; परंतु यश सगळ्यांना मिळतेच असं नाही.

अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हे आपण लहानपणापसून ऐकत आलो आहोत. हेच लक्षात ठेऊन थोडी जास्त तयारी करून अजून एक चान्स घेऊ म्हणत-म्हणत अनेक जण या अपयशाच्या पायऱ्यांचा जणू जिनाच चढत जातात. 5-6 वर्ष प्रयत्न केल्यानंतर मग वाटायला लागतं की सुरवातीला कुठलातरी प्लान B तयार केला असता तर कदाचित आता आयुष्य वेगळं असलं असतं; परंतु अनेक जणांसाठी वेळ निघून गेलेली असते.

2022 मध्ये 11,52,000 विद्यार्थ्यांनी देशातील सर्वात अवघड समजली जाणारी UPSC परीक्षा दिली. त्यातील एकूण 933 विद्यार्थी निवडले गेले. म्हणजे निवड झालेल्यांची टक्केवारी आहे 0.08%. मग उरलेल्या 99.92 उमेदवारांचं काय? काही जण रिपीट करतात आणि यशस्वी देखील होतात; परंतु अयशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

हीच परिस्थिती MPSC मध्ये देखील आहे. पुण्याला गेल्यावर 8-9 वर्षांपासून एक मार्काने गेलं, दोन मार्काने गेलं म्हणत सतत त्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी सर्रास पाहायला मिळतील. त्यातील अनेकांना निवड झाली नाही तर पुढे काय? याची कल्पना देखील नसते.

आणि याच बाबींचा विचार करून नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सावध होणे गरजेचे आहे. आपण अमुक व्यक्तींचे so called motivational video पाहतो. मी इतका तास अभ्यास केला, मी हे सोडून दिलं, ते सोडून दिलं आणि त्यामुळेच आज मला ही पोस्ट मिळाली असे म्हणणारे शेकडो व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतील. हेच व्हिडीओ पाहून आपल्यातील अनेक जणांच्या डोक्यावर स्पर्धा परीक्षेचं भूत नाचायला लागतं. या व्हिडीओचा प्रभाव दोन ते तीन महिने टिकतो. नंतर घरच्यांना भांडून पुण्याला गेलेला विद्यार्थी आता घरी कुठल्या तोंडाने वापस जाऊ म्हणत बळजबरी परीक्षेची तयारी करतच राहतो.

त्यामुळे परीक्षेची तयारी सुरु करणाऱ्या विद्यार्थ्यानो, एक back-up प्लान बनवून ठेवा. घरचे किती वर्ष पैसे पुरवू शकतात, आपली capacity काय आहे, आपल्याला खरंच हे जमणार आहे का या गोष्टींचा अगोदर अभ्यास करा. जर स्पर्धा परीक्षेमध्ये यश नाही मिळालं तर कुठला कोर्स करून नंतर मी जॉब मिळवू शकतो याची माहिती अगोदरच घेऊन ठेवा. पूढचं पुढे बघू या मानसिकतेतून बाहेर या कारण बऱ्याच वेळा पुढे जे काही होतं ते खरंच बघवत नाही.....!

मला कुणाला demotivate नाही करायचं. प्रामाणिकपणाने प्रयत्न करणाऱ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळतच. शून्यातून विश्व निर्माण करणारे अनेक उदाहरणं इथे पाहायला मिळतात. चार-पाच प्रयत्नानंतर यश मिळविणारे देखील अनेक आहेत; परंतु प्रत्येकालाच हे यश मिळेल याची खात्री कुणीच देणार नाही.

त्यामुळे शांत डोक्याने, अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच या स्पर्धा परीक्षेच्या मायाजालामध्ये उतरा आणि उतरलात तर 100 % नाही तर 500% म्हणजे आता करण्याचा विचार करताय त्याच्या पाचपट मेहनत करण्याची तयारी ठेवा... 

लवकरच भेटूया अजून एका interesting topic सोबत...

तोपर्यत..

जय हिंद.. जय महाराष्ट्र...!

धन्यवाद ....!

©प्रभाकर घाटगे